Theft of donation in Indapur/इंदापूर मध्ये दानपेटी चोरीला ; कालठण नं-१ मधील घटनेतील चोरटे सीसीटीव्हीत कैद.
इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू.

इंदापूर,दि १६
- इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ येथील ग्रामदैवत श्री काळभैरव मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ही संपूर्ण चोरी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३:२० च्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून सुमारे ४,००० ते ४,५०० रुपयांची रोकड असलेली दानपेटी उचलून पोबारा केला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी काकासाहेब बयाजी मांढरे (वय ६१, रा. कालठण नं. १) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अदखलपात्र गुन्हा (NCR क्र. १४८५/२०२६) नोंदवण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खान हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करत आहेत.
वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नाळे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.परिसरातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गावागावांत तात्काळ ‘ग्राम सुरक्षा दल’ स्थापन करून रात्रीची गस्त घालण्याचे व कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.



