क्राईम

VVIP सुरक्षेची इच्छा अन् हल्ल्याचा कट? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा.

इंदापूर,दि २४

  • बारामती विमानतळ परिसरात १८ ऑक्टोबर रोजी राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आल्याचे वृत्त आहे. मंत्र्यांप्रमाणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींप्रमाणे पोलिस संरक्षण मिळावे, या इच्छेतून सूर्यवंशी यांनी स्वतःवरील हल्ल्याचा कट रचल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचे एका वरिष्ठ विश्वसनीय वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळ परिसरात सूर्यवंशी यांच्यावर सशस्त्र हल्ला झाला होता. या प्रकरणात दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहितीही समोर आली होती.तपासादरम्यान पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक झाल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट येथील रहिवासी आणि सध्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील थोरातनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ज्ञानदेव महादेव शिंदे याचे नाव समोर आले आहे. त्याने सूर्यवंशी यांच्या हातावर वार केल्याची माहिती वृत्तात देण्यात आली आहे.

राणा सूर्यवंशी यांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पोलिस कर्मचारी तैनात असल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या संदर्भात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी संबंधित जिल्ह्यांच्या युनिट कमांडरना जाब विचारल्याचे वृत्त आहे.तसेच, या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी अतिरिक्त पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे खासगी व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या पोलिस संरक्षणाची प्रक्रिया, त्यासाठीचे निकष आणि सुरक्षाव्यवस्थेचा संभाव्य गैरवापर याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तथापि, हल्ल्याचा कट, त्यामागील कथित हेतू आणि संबंधितांची भूमिका याबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!