INDAPUR/वाघाळे वनक्षेत्रात खोदकाम, कालव्याच्या पोटचारीचे नुकसान; सराफवाडीकरांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा.

इंदापूर,दि २३
- इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथील वाघाळे तलावातील पाणी नेण्यासाठी वन विभागाच्या गट क्रमांक ९६ व ९७ मधील वनक्षेत्रात अनधिकृतपणे खोदकाम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या खोदकामामुळे निरा डावा कालव्याच्या पोटचारीचे तसेच वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघाळे तलावातील पाणी खासगी शेतीसाठी नेण्याच्या उद्देशाने वनक्षेत्रातून खोदकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शासकीय कालव्याच्या मालमत्तेचे आणि वनक्षेत्रातील वृक्षसंपत्तीचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वन विभाग आणि जलसंपदा विभागाकडून संबंधित खोदकाम बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा खोदकाम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणात अंजू मुलाणी, राजू बावकर आणि जेसीबी मशीनचे मालक बापूराव करे यांच्यासह प्रत्यक्ष खोदकाम करणाऱ्या तसेच या कामाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींची भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खोदकामासाठी वापरण्यात आलेली जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर साहित्य जप्त करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या कथित दबावामागे नेमके कोण आहे आणि संबंधित प्रकरणात कारवाई करण्यास विलंब होत आहे का, याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
वाघाळे तलावातील पाणी खासगी विहिरींमध्ये साठवून तेथून पाच ते सात किलोमीटर अंतरावरील खासगी शेतांना पुरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे सराफवाडीसह परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वन विभाग, जलसंपदा विभाग आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संयुक्त चौकशी करावी, अनधिकृत खोदकामाची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर प्रकरणाबाबत इंदापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.



