NCDC meet Delhi/ NCDC चा आगामी २५ वर्षांचा रोड मॅप दोन महिन्यांत तयार होणार.
चालू वर्षात सहकारी संस्थांना १.५० लाख कोटींचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट; हर्षवर्धन पाटील बैठकीला उपस्थित.

इंदापूर,दि ३०
- नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या (एनसीडीसी) महापरिषदेची ९३ वी बैठक गुरुवारी (दि. २९) एनसीडीसीच्या मुख्यालयात केंद्रीय सहकार व गृहमंत्री तथा एनसीडीसीचे अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत एनसीडीसीच्या आगामी २५ वर्षांच्या विकासाचा रोड मॅप येत्या दोन महिन्यांत तयार करण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले.
या बैठकीस एनसीडीसीचे संचालक तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. देशाच्या विकासामध्ये एनसीडीसी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार अमित शाह यांनी यावेळी काढले. आगामी रोड मॅपमध्ये संस्थात्मक रचना, संसाधनांची उपलब्धता आणि कामकाजातील आवश्यक बदलांचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये २०१३ पासून पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी विशेष सहकारी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे संबंधित क्षेत्रातील उत्पन्नात सुमारे ३३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून, जवळपास आठ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची माहिती अमित शाह यांनी बैठकीत दिली.
देशातील सहकारी संस्थांना चालू वर्षात १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आगामी पाच वर्षांत हे उद्दिष्ट चार लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
एनसीडीसीच्या माध्यमातून देशातील साखर उद्योगाला आतापर्यंत ४० हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला असून, त्यामध्ये महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योगदानाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीत एनसीडीसीचे अध्यक्ष अमित शाह यांचे अभिनंदन केले.
- देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनसीडीसीचे मजबूत जाळे निर्माण झाले आहे. याचा लाभ साखर उद्योगासह सहकारी प्रक्रिया उद्योग, शेतकरी, दुग्धव्यवसाय, भारत टॅक्सी, मत्स्यव्यवसाय आणि महिला क्षेत्राला होत असल्याचे अमित शाह यांनी बैठकीत नमूद केले.



