सामाजिक

INDAPUR story of Shivrais’s feats – मुलं रडली म्हणून मोबाईल देऊ नका; शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा सांगा – डाॅ शिवरत्न शेटे.

लाड करा, पण हट्ट पूर्ण करू नका… कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव करून द्या’.

इंदापूर, दि.१४

  • आज मुलांच्या हातात मोबाईल आहे; पण त्या हातात पुस्तक आहे का? मुलं हट्ट करतात म्हणून त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जातात; पण त्यांना आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव करून दिली जाते का? असा थेट आणि भावनिक सवाल उपस्थित करत शिवव्याख्याते व दुर्गभ्रमंतीकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी पालकांच्या मनाला भिडणारे मार्गदर्शन केले.

कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला संस्कार शिकूया’ या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित व्याख्यानात डॉ. शेटे बोलत होते. स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवा नेते व संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील उपस्थित होते.

माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना केवळ तलवार चालवायला शिकवले नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, रयतेसाठी जगण्याचे आणि स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे संस्कार दिले. याच संस्कारांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्यांच्या एका हाकेला मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार झाले.

आजच्या काळातील पालकांनीही आपल्या मुलांच्या हातात प्रत्येक वेळी मोबाईल देण्याऐवजी शूरवीरांच्या पराक्रमाच्या कथा, इतिहासाची पुस्तके आणि संस्कारांची शिदोरी द्यावी, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले.मुलांवर प्रेम करा; पण त्यांच्या प्रत्येक हट्टापुढे झुकू नका. कारण आज हट्ट पूर्ण करताना मिळणारा आनंद क्षणिक असतो; मात्र परिस्थितीची आणि आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव झालेला मुलगा आयुष्यभर कष्टाची किंमत ओळखतो.

बाहेरगावी शिक्षणासाठी राहणाऱ्या मुला-मुलींवरही पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या नावाखाली मागितलेला प्रत्येक पैसा खरोखर शिक्षणासाठीच खर्च होतोय का, याची शहानिशा पालकांनी करावी. मुलगा शिकतोय की आई-वडिलांच्या कष्टावर कर्जाचा डोंगर उभा करतोय, याचे भान पालकांना असले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचा दाखला देत डॉ. शेटे यांनी महिलांच्या सामर्थ्याचीही जाणीव करून दिली. हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या महाराणी ताराबाईंनी राजाराम महाराजांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. घरातील आई जर आपल्या मुलांच्या मनात संस्कार, धैर्य आणि कर्तृत्वाची बीजे पेरत असेल, तर त्या घरातून उद्याचा इतिहास घडवणारी पिढी निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

“आपल्या बालपणी जे मिळाले नाही, ते मुलांना देणे चांगले; पण त्यासाठी स्वतःचे कष्ट विसरायला लावू नका. मुलांना सुख द्या, पण संघर्षाची जाणीवही द्या. कारण पैशाने वस्तू मिळतात; मात्र संस्कारांनी माणूस घडतो!” या संदेशातून डॉ. शेटे यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले.

या व्याख्यानातून मुलांना केवळ शिक्षण नव्हे, तर संस्कार, कर्तव्याची जाणीव, कष्टाची किंमत आणि आपल्या आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव देणे हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे, हा प्रभावी संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!