Ganeshotsav Indapur Police/गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; इंदापूर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन.
अध्यक्ष, सचिव, पोलीस पाटील व पदाधिकाऱ्यांची बैठक; कायदा-सुव्यवस्था आणि शांततेसाठी पोलिसांकडून मार्गदर्शन.

इंदापूर,दि.१२
- सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी इंदापूर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सचिव, पोलीस पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांची बैठक आज इंदापूर येथे पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनासह ध्वनिक्षेपक, मिरवणूक, वाहतूक, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे उपस्थित होते.गणेशोत्सव हा सर्व समाजाला एकत्र आणणारा उत्सव असून, उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा कायम राहणे आवश्यक आहे. त्यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून उत्सवाचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
गणेश मंडप उभारताना संबंधित प्रशासनाच्या आवश्यक परवानग्या घेणे, मंडपामुळे वाहतुकीला अथवा नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, विद्युत रोषणाई व वायरिंग सुरक्षित पद्धतीने करणे तसेच मंडप परिसरात गर्दीचे योग्य नियोजन करण्याबाबत मंडळांना सूचना करण्यात आल्या.
गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकाचा वापर शासनाने निश्चित केलेल्या नियम व ध्वनीमर्यादेनुसारच करावा, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, CCTV कॅमेरे बसवा, महिलांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना राबवा, सामाजिक संदेश देण्यासारख्या नव-नवीन थीम राबवा, वृक्षारोपण करा असे पोलिसांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही यावेळी आवाहन करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवरही मंडळांना मार्गदर्शन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी मंडळांनी स्वयंशिस्त पाळावी आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
इंदापूर ही ऐतिहासिक भूमी असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा विरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांची जहागिरी असलेले हे इंदापूर गाव आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यानंतरच मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवाला सुरुवात झाली. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी गणेश उत्सवाला मोठे स्वरूप दिले. गणेशोत्सव समाज प्रबोधन करण्यासाठी सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गणेश मंडळांनी सामाजिक काम करत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
श्री.गणेश बिरादार , अप्पर पोलिस अधीक्षक
गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावर अफवा, चुकीची माहिती किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणारे संदेश, फोटो अथवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि आक्षेपार्ह अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या बाबी निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
उत्सव काळात काही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी स्वतःहून कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गणेशोत्सव शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिक यांच्यात समन्वय महत्त्वाचा असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. इंदापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि संबंधित प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.



