Nira-Bhima factory/नीरा-भीमा कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार ; नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील यांच्यासह संचालक मंडळाने स्वीकारला पुरस्कार.

इंदापूर,दि २३
- शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास गाळप हंगाम २०२५-२६ साठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांचा राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मंगळवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे आणि संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. त्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्या हस्ते नीरा भीमा कारखान्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने केलेल्या उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीची दखल घेत हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामातच देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केली.
या पुरस्काराबद्दल हर्षवर्धन पाटील आणि भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतकांचे अभिनंदन केले.नीरा भीमा कारखान्यास आतापर्यंत या पुरस्कारासह राज्य आणि देशपातळीवरील एकूण १४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशी माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.
पुरस्कार स्वीकारताना लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अॅड. कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह गुजरात, पंजाब, हरियाणा, ओडिशा आदी राज्यांचे सहकार मंत्री, पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशभरातील विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते.महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.



