कृषी

Dattatrey bharane/शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

इंदापूर,दि २४

  • राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे शासन अतिशय गांभीर्याने पाहत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील पहिली अधिसूचना निघणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री भरणे यांनी देऊळगाव, मोरगाव, मुर्टी, नावळी आणि कोळविहीरे या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची तसेच पाणी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमध्ये २ ते ३ आठवड्यांचा पावसाचा खंड पडला आहे. भोर व वेल्हा तालुक्यांमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसाचा खंड असून, ४ आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड असलेल्या तालुक्यांमध्ये बारामती, शिरूर, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खेड या तालुक्यांचा समावेश असल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली.

पावसातील दीर्घ खंडामुळे पुणे विभागातील खरीप पिकांवरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीची केवळ आकडेवारीच्या आधारे पाहणी न करता प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

कृषी व संबंधित विभागांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची अचूक नोंद करण्यात येत आहे. पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन पंचनामे तसेच आवश्यक प्रस्तावांची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही कृषिमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!