INDAPUR NEWS/इंदापूरच्या प्रभाग ३ मध्ये शासकीय जागेवरचा अतिक्रमणाचा मुद्दा तापला; नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी.

इंदापूर,दि ९
- इंदापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील शासकीय मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत संबंधित नगरसेवकावर कारवाई करण्याची तसेच त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी प्रभागातील रहिवाशांनी केली आहे. याबाबत इंदापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, कसबे इंदापूर येथील सिटी सर्व्हे क्रमांक ४९२२, क्षेत्रफळ १९,६८३ चौ.मी. ही जागा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. सदर जागेवर प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक गणेश नंदू राऊत, त्यांचे वडील नंदू महादेव राऊत व इतर संबंधित व्यक्तींनी बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, गट क्रमांक ३२९ पर्यंत जाणारा सार्वजनिक रस्ता अडविण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. शासकीय रस्त्यावर कथितरीत्या कंपाऊंड घालून झाडे लावण्यात आल्याने सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग अडवला गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. मात्र, संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.तक्रारदारांनी संबंधित जागेची स्वतंत्र सक्षम पथकामार्फत पाहणी करून स्थळ पंचनामा, अतिक्रमणाची मोजणी तसेच मंजूर बांधकाम नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकामाची तुलनात्मक तपासणी करण्याची मागणी केली आहे.
अतिक्रमणाचा आरोप चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधित नगरसेवकावर कायदेशीर कारवाई करून नगरसेवकपद रद्द करण्याबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी आणि चौकशीचा लेखी अहवाल तक्रारदारांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय जागेवरील कथित अतिक्रमण आणि सार्वजनिक रस्ता अडवल्याच्या या तक्रारीवर इंदापूर नगरपरिषद प्रशासन काय कारवाई करते, तसेच नगरसेवकपदाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सदर तक्रारी अर्जाबाबत नगरसेवक गणेश राऊत यांच्याशी ‘बातमी चे बोला’च्या माध्यमातून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रकरणाबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.



