क्रीडा
Indapur big news/इंदापूरमध्ये ७ सप्टेंबरला भव्य दहीहंडी उत्सव; भरतशेठ शहा मित्र परिवाराची जोरदार तयारी.

इंदापूर,दि ३
- इंदापूर येथे नगराध्यक्ष भरतशेठ शहा आणि मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा उत्सव रंगणार असून, त्यासाठीची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे.
या दहीहंडी उत्सवात विविध नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून मानाच्या दहीहंडी स्पर्धेत थरावर थर रचण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. त्यामुळे इंदापूरकरांना यंदाही थरारक दहीहंडीचा अनुभव घेता येणार आहे.
उत्सवाला राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर नेते, अभिनेते तसेच विविध पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याचबरोबर ‘फोक प्रबोधन – चला संस्कृती जपूया’ या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक संस्कृती आणि लोककलेचा जागर करण्याबरोबरच तरुणाईमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.



