क्राईम

Pandharpur news/ वयाच्या सत्तरीत फुटले प्रेमाचे अंकुर, अनैतिक संबंधातून वृद्ध महिलेनं केला खून, दीड महिन्याने कांड उघड.

पंढरपूर,दि २१

  • पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून आणि किरकोळ वादातून एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे.

ही घटना घडल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी ‘डीएनए’ (DNA) चाचणीच्या अहवालावरून मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सूत्रे फिरवून आरोपी वृद्ध महिलेला गजाआड केलं आहे.

अंबादास खांडेकर (वय ७०) आणि मंगल होनमाने या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध आणि प्रेमप्रकरण सुरू होते. २७ जुलै रोजी या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून तीव्र वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले. रागाच्या भरात मंगल हिने एका शेतामध्ये अंबादास यांची हत्या केली. एवढेच नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिने त्यांचा मृतदेह अर्धवट जाळून टाकून तेथून पळ काढला.

२ ऑगस्ट रोजी परिसरातील शेतात एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने आणि कोणताही पुरावा नसल्यामुळे पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. तपासादरम्यान पोलिसांनी अंबादास खांडेकर यांच्या दोन मुलींचे ‘डीएनए’ नमुने घेत चाचणीसाठी पाठवले.

घटनेच्या तब्बल दीड महिन्यानंतर आलेल्या डीएनए अहवालावरून तो मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचं निष्पन्न झालं. मृतदेहाची ओळख पटताच पंढरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत मंगल होनमाने हिला ताब्यात घेतलं.

पोलीस कोठडीत मंगलची कसून चौकशी केली असता, प्रेमप्रकरणातील भांडणातून आणि वादातूनच अंबादास यांची हत्या केल्याची कबुली मंगल हिने दिली. वयाच्या ७० व्या वर्षी घडलेल्या या विचित्र घटनेनं संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!