इंदापूरमध्ये अवैध सुगंधी गुटखा साठ्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३५.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त.
इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई?

इंदापूर,दि १८
- स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व इंदापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गलांडवाडी नं.१ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध सुगंधी गुटखा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ₹३५,५१,४१६ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.१६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं.१ येथील सोलापूर-पुणे महामार्गालगत असलेल्या एका बंद टाटा गॅरेजमध्ये विविध कंपन्यांचा शासनाने बंदी घातलेला सुगंधी गुटखा साठवून ठेवण्यात आला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकत संबंधित ठिकाणी पाहणी केली असता, गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा साठवलेला आढळून आला. पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या कारवाईत लाल, पांढऱ्या व इतर रंगांच्या पॅकेटमध्ये भरलेला गुटखा, पाउच व बॉक्स अशा स्वरूपात मोठा साठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत विविध प्रकारच्या गुटख्याच्या पिशव्या, पाउच आणि बॉक्सचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ₹३५,५१,४१६ इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पंचांसमक्ष सील करण्यात आले आहेत.
या प्रकरणी गॅरेज मालक शकील इमायुद्दीन काझी (रा. व्यंकटेशनगर, इंदापूर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, फौजदार असिफ शेख, पोलीस हवालदार निलेश शिंदे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.



