Pulse polio/शहा येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कल्पना विष्णू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.

इंदापूर,दि २३
- शहा (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. २२ रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती इंदापूर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिंगणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोहिमेला शहा परिसरातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मोहिमेचा शुभारंभ माळवाडी पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ. कल्पना विष्णू पाटील व शहा गावचे सरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब देऊन करण्यात आला.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्या सौ. कल्पना विष्णू पाटील म्हणाल्या की, बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिओ लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य द्यावेत. कोणत्याही कारणास्तव एखाद्या बालकाचे लसीकरण राहिले असल्यास पालकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसीकरण पूर्ण करून घ्यावे. बालकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी पालकांनी आरोग्य विभागाच्या प्रत्येक मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शहा परिसरातील पालकांनी आपल्या लहान बालकांना लसीकरण केंद्रावर आणून पोलिओचे दोन थेंब दिले. त्यामुळे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचावा आणि एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविली.यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिंगणगाव येथील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



