Bheem aakrosh’ in Indapur/इंदापूरमध्ये ‘भीम आक्रोश’चा एल्गार! शरद चितारेंचा इशारा, जीवन बनसोडेंनी आरोप फेटाळले.
इंदापूरपासून राज्यभर ‘भीम आक्रोश’ आंदोलन छेडण्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा इशारा.

इंदापूर,दि १३
- भिगवण येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याच्या आरोपावरून इंदापूर तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘भीम आक्रोश आंदोलन’ छेडण्याची घोषणा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी बोलताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शरद चितारे यांनी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर गंभीर आरोप केले. “तहसीलदार जीवन बनसोडे हे मग्रूर अधिकारी असून, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानत नाहीत,” असा आरोप चितारे यांनी केला. तसेच, “तहसीलदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा इतका तिरस्कार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास इंदापूर तालुक्यातून राज्यभर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दिला.
दरम्यान, पत्रकार परिषदेतून तहसीलदारांविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली असून, आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेला आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकरणाबाबत इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांची “बातमी चे बोला” च्या माध्यमातून प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शरद चितारे यांचे आरोप फेटाळून लावले. “शरद चितारे हे खोटे बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणतेही तथ्य नाही,” असे तहसीलदार बनसोडे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवरून सुरू झालेला हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता असून, आगामी काळात आंबेडकरी संघटनांची भूमिका आणि प्रशासनाकडून याबाबत काय कारवाई केली जाते, याकडे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



