क्राईमविशेष

Pune rural LCB/गुन्हेगारांचे कर्दनकाळ! पुणे ग्रामीणच्या LCB पथकाचा IG रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते विशेष सन्मान.

सराईत गुन्हेगारांना बेड्या, मोठमोठ्या गुन्ह्यांचा छडा आणि गुन्हेगारीवर प्रभावी वचक.

पुणे,दि २८

  • गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला आहे. या सन्मानामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर वरिष्ठांकडून कौतुकाची मोहोर उमटली आहे.

यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस हवालदार अजय घुले, पोलीस हवालदार किशोर तेलंग आणि पोलीस हवालदार गणेश ढेरे यांचा समावेश आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या काही काळात गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास करत गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहे. विशेष म्हणजे अनेक मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्यात या पथकाने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

केवळ गुन्हे घडल्यानंतर त्यांचा तपास करणे एवढ्यापुरतेच या पथकाचे काम मर्यादित राहिले नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेणे आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाई करणे अशा विविध आघाड्यांवर या विभागाने आपली छाप निर्माण केली आहे.

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागाच्या कामकाजाला अधिक गतिमानता मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुन्हे उघडकीस आणण्यावर विशेष भर दिला असून, अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या कामकाजाची आणि पथकाच्या एकत्रित प्रयत्नांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या चारही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरणाच्या माध्यमातून पोलीस दलाची प्रतिमा उंचावणाऱ्या या पथकाला मिळालेला हा सन्मान निश्चितच अभिमानास्पद मानला जात आहे.

गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारी कारवाई आणि जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तत्परता, हीच पोलिसांच्या कामाची खरी ओळख! पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या सन्मानामुळे पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील कामगिरीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि तपासातील अचूकता यांचा संगम असलेल्या पुणे ग्रामीण LCB पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!