abduction of 14 year boy/भांडगाव येथून १४ वर्षीय मुलाचे अपहरण; यवत पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल.

दौंड, दि ३०
abduction14 year boy/दौंड तालुक्यातील भांडगाव येथील टेस्टी बाईट कंपनीत काम करणाऱ्या एका कुटुंबातील १४ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी मुलाची आई गुलफशा जहीर अहमद (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आपल्या पती व तीन मुलांसह भांडगाव येथे वास्तव्यास असून टेस्टी बाईट कंपनीत काम करून उदरनिर्वाह करतात. २७ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादींच्या पतींनी घरी फोन केला असता त्यांचा मोठा मुलगा सैफ जहीर अहमद (वय १४) शेजारी गेला असल्याचे सांगण्यात आले.
रात्री सुमारे ११ वाजेपर्यंत मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत आईने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बेपत्ता मुलगा सैफ जहीर अहमद हा सुमारे ५ फूट उंच, सावळा वर्ण, काळे बारीक केस, उभट चेहरा, मध्यम बांधा असून हिंदी भाषा बोलतो. अंगात काळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट व पायात काळ्या रंगाच्या चप्पल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


