आरोग्य

Tukaram Munde/तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला इंदापूरात केराची टोपली? ‘स्टिंग’ची राजरोस विक्री.

सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या हातात एनर्जी ड्रिंक, अन्न व औषध प्रशासन झोपेत?

इंदापूर, दि‌ ३१

  • अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळांच्या परिसरात ठरवून दिलेल्या अंतरापर्यंत ‘स्टिंग’ या ऊर्जा पेयाच्या विक्रीबाबत निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाचा उद्देश अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे एनर्जी ड्रिंकचे सेवन रोखणे आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे हा होता. मात्र, इंदापूर शहरातील सद्यस्थिती पाहता या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसत नाही.

इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शाळांच्या आसपासची काही दुकाने तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी ‘स्टिंग’ची विक्री खुलेआम सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थी आणि युवक हे पेय सहज खरेदी करून सार्वजनिक ठिकाणी त्याचे सेवन करताना दिसतात. त्यामुळे संबंधित विभागाचे आदेश केवळ कागदावरच राहिले आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जर शासनाने आदेश काढले असतील, तर त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र, इंदापूरमध्ये प्रत्यक्षात विक्री सुरूच असल्याने आदेशांना केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

याचबरोबर शहरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून भेळ, वडापाव, समोसा, पॅटीस, भजी आणि इतर तळलेले पदार्थ आजही वर्तमानपत्रामध्ये दिले जात असल्याचे दिसून येत आहे. शाईयुक्त वर्तमानपत्राचा अन्नपदार्थांशी थेट संपर्क आरोग्यासाठी धोकादायक मानला जात असतानाही या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मात्र, परवानगी दिलेला फूड ग्रेड पेपर अथवा ग्रीस प्रूफ पेपर हा महाग असल्याने तो विक्रेत्यांना परवडत नाही. त्यामुळे सर्रास वर्तमान पत्राचा वापर केला जात आहे.

प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश, परिपत्रके आणि जनजागृती केली जाते; मात्र त्यानंतर प्रत्यक्ष तपासणी, धडक मोहीम आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई किती होते, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत.इंदापूरमध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग विशेष तपासणी मोहीम राबवणार का? नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार का? शाळांच्या परिसरात सुरू असलेली विक्री थांबवली जाणार का? आणि अल्पवयीनांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन तातडीने लक्ष देणार का? या प्रश्नांची उत्तरे आता इंदापूरकरांना अपेक्षित आहेत.

नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे,केवळ आदेश काढून चालणार नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणीही झाली पाहिजे. अन्यथा शासनाचे आदेश कागदापुरतेच मर्यादित राहतील आणि त्याचा फटका थेट समाजाच्या आरोग्याला बसत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!