Subhash darenge, atrocity and posco/बाभुळगावातील सुभाष संभाजी डरंगेसह तिघांवर ॲट्रॉसिटी, पॉक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल.

इंदापूर,दि २८
- इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे चार गुंठे जागेच्या व्यवहारातून फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, महिलेला शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे तसेच अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर आरोपांप्रकरणी सुभाष संभाजी डरंगे, शिवाजी दशरथ जगताप आणि दशरथ नामदेव आसबे यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी), पॉक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बाभुळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुभाष डरंगे याने ९ मार्च २०२६ रोजी चार गुंठे जागेचा व्यवहार करून देण्याचे आमिष दाखवत नोटरी दस्तऐवज तयार केला. मात्र, त्या दस्तऐवजात गट क्रमांकाचा उल्लेख नसल्याने तसेच बनावट ग्रामपंचायत दाखला आणि खोटा नमुना क्रमांक ८ तयार करून संबंधित जमीन स्वतःची असल्याचे भासवत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्यवहार २ लाख ६० हजार रुपयांत ठरला होता. त्यापैकी १ लाख रुपये आगाऊ घेण्यात आले, तर उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते.
फिर्यादीने ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा संबंधित जमिनीशी कोणताही मालकी हक्क नसतानाही ती जमीन विकल्याचे दाखवून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, उर्वरित १ लाख ६० हजार रुपये देण्यासाठी आरोपींकडून सतत दबाव टाकण्यात येत होता. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर ८ जुलै २०२६ रोजी रात्री फिर्यादीच्या घरी आरोपी सुभाष डरंगे, शिवाजी जगताप व दशरथ आसबे आले. यावेळी फिर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिचा हात पकडत दमदाटी करण्यात आली. तिचा सार्वजनिक अपमान करण्याचा प्रयत्न झाला, तसेच घरातील अल्पवयीन मुलीलाही धमकावण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
आरोपींच्या भीतीमुळे यापूर्वी तक्रार करण्याचे धाडस झाले नव्हते. मात्र, कुटुंबीय व नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर अखेर इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सुभाष संभाजी डरंगे, शिवाजी दशरथ जगताप आणि दशरथ नामदेव आसबे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी, पॉक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


