इंदापूरमध्ये स्वयंघोषित युवा नेत्याची सावकारी चर्चेत! १० लाख दिले, १३ लाख वसूल; तरीही पैशांसाठी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी?
फोनवरील शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल; पत्नीला दमदाटी केल्याचाही आरोप, इंदापूर पोलीस ठाण्यात NC दाखल.

इंदापूर,दि ७
- इंदापूर शहरातील एका प्रसिद्ध व्यापारी आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या कुटुंबातील स्वयंघोषित युवा नेत्याच्या कथित सावकारी व्यवहाराची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. एका प्रतिष्ठित व्यक्तीला व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी संबंधित युवा नेत्याने फोनवरून अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित युवा नेत्याने त्यांना तब्बल १० लाख रुपये व्याजाने दिले होते. या रकमेपोटी आतापर्यंत १३ लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मात्र, तरीदेखील आणखी पैसे बाकी असल्याचे सांगत संबंधित युवा नेत्याने फोनवरून वैयक्तिक पातळीवर जाऊन गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. ‘तू समोर ये, तुला बघून घेतो’, अशा शब्दांत धमकी दिल्याचाही आरोप आहे.
एवढेच नव्हे तर संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीलाही शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या संपूर्ण प्रकारातील कथित शिवीगाळीचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या प्रकरणाची इंदापूर शहरात चर्चा रंगली आहे.
इंदापूर शहरातील सोनाईनगर परिसरातील एका पाटील कुटुंबातील युवा नेता असल्याचा आरोप आहे. पित्याचे राजकीय वलय आणि बड्या नेत्यांशी असलेल्या जवळच्या संबंधांचा आधार घेत संबंधित व्यक्तीकडून व्यवसायाच्या नावाखाली सावकारीचा व्यवहार सुरू असल्याचीही चर्चा आहे.
या प्रकरणी संबंधित युवा नेत्याच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमांतर्गत चौकशी करून, बेकायदेशीर सावकारी आढळल्यास कठोर कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तक्रारदाराने केली आहे.
आता या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई होते? कथित सावकारी व्यवहाराची सखोल चौकशी होते का? आणि व्हायरल ऑडिओमागील नेमके सत्य काय? याकडे इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे.



