विशेष

SIR INDAPUR/आमचं सरकार असलं तरी चुकीचं होत असेल तर जनआंदोलन करणार SIR मधील मतदार यादीच्या घोळावर प्रदीप गारटकर आक्रमक.

अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याचा इशारा.

इंदापूर ,दि २०

  • राज्यात आणि केंद्रात आमच्या पक्षाचे सरकार असले, तरी चुकीचे होत असेल तर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी दिला. इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील मतदार यादीतील कथित विसंगती आणि एसआयआर प्रक्रियेतील नोंदींच्या घोळावरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

पिंपळे गावातील बूथ क्रमांक २० मध्ये सुमारे ९० ते ९२ मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने मॅप करण्यात आल्याचा दावा गारटकर यांनी पत्रकार परिषदेत केला. काही मुलींचे विवाह झाल्यानंतर त्या बारामती येथे स्थलांतरित झाल्या आहेत. मात्र, त्यांची नावे पिंपळे तसेच बारामती येथील मतदार यादीत असल्याचा दावा त्यांनी केला.

“मतदार यादीतील हा घोळ आम्ही उघडकीस आणणार असून याबाबत जनआंदोलन उभारू. राज्यात आणि केंद्रामध्ये आमचे सरकार आहे म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन करायचे नाही, असे कुठेही लिहिलेले नाही. सरकार आमचे असले तरी चुकीचे काही होत असेल तर आंदोलन केलेच पाहिजे,” असे गारटकर यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले, “सरकारमधीलच अधिकारी आहेत. त्यांना आम्ही पुरावे दिले आहेत. मात्र, पुरावे देऊनही अधिकारी हे शक्यच नाही, असे म्हणत असतील तर हे असे चालणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करू.” एसआयआर प्रक्रियेचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करणे हा आहे. त्यामुळे दुबार, स्थलांतरित अथवा चुकीच्या नोंदींची योग्य पद्धतीने पडताळणी होणे आवश्यक असल्याचे गारटकर यांनी सांगितले.

पिंपळे गावातील मतदार यादीतील कथित विसंगतीची तातडीने चौकशी करून चुकीच्या नोंदी दुरुस्त कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या पुराव्यांची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदीप गारटकर यांनी दिला.

“सरकार आमचं असलं तरी चुकीच्या कामाला पाठिंबा नाही” — प्रदीप गारटकर यांच्या या भूमिकेमुळे एसआयआर प्रक्रियेतील मतदार यादीच्या पडताळणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!