Dattatraya Bharne/आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचला पाहिजे : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे.

इंदापूर,दि २६
- Dattatraya Bharne/शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचू शकतो, असे प्रतिपादन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatraya Bharne) यांनी केले.
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्री नारायणदास रामदास शहा ट्रस्ट यांच्या वतीने शहा सांस्कृतिक भवन येथे भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कृषीमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा, आप्पासाहेब जगदाळे, डॉ. विद्युत शहा, मुकुंद शहा, शकीलभाई सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. भरणे यांनी इंदापूरमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले की, अनेक गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना सातत्य दिले जाईल.
शिबिरात हृदयरोग, मधुमेह, दंतरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, जनरल सर्जरी, मेंदूरोग आदी विविध आजारांची तपासणी व उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.



