इंदापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन इंदापूर’ यशस्वी.

इंदापूर,दि १५
- इंदापूरच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एका मोठ्या स्थानिक नेत्याचा प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. आता या चर्चेला अधिक बळ मिळाले असून, इंदापूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग शिंदे हे आपल्या शेकडो कार्यकर्ते व माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते भरत गोगावले यांच्याशी पांडुरंग शिंदे यांची सकारात्मक चर्चा झाली असून, प्रवेशाबाबत अंतिम टप्प्यातील हालचाली सुरू आहेत.सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी पांडुरंग शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत थेट पक्ष नेतृत्वाशी बोलणे करून दिले.
या पार्श्वभूमीवर लवकरच इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जर हा प्रवेश प्रत्यक्षात झाला, तर इंदापूरच्या स्थानिक राजकारणात शिवसेनेला मोठे बळ मिळणार असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.



