फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; धनंजय मुंडे, सुनील शेळके यांची नावे चर्चेत.

पुणे ,दि.१४
- राज्यातील फडणवीस सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात राज्य सरकार किंवा संबंधित पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनाही मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
याशिवाय, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनाही पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांना वगळून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काही राजकीय वर्तुळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडींच्याही चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भविष्यात महायुतीला पाठिंबा देऊ शकतो, तसेच राज्य आणि केंद्रातील सत्तेत सहभागी होण्याची शक्यता असल्याचे काही सूत्रांचे दावे आहेत. त्यानुसार आ.जयंत पाटील यांना राज्यात अर्थमंत्रीपद, तर खा.सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, अशा चर्चाही रंगल्या आहेत.
त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्यातील कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.



