Harshvardhan Patil Indapur/धो-धो पाऊस पडू दे; हर्षवर्धन पाटील यांचे नंदिकेश्वर चरणी साकडे.

इंदापूर, दि २५
- इंदापूर तालुक्यासह राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आगामी रब्बी हंगाम चांगला जावा आणि तालुका सुजलाम् सुफलाम् व्हावा, यासाठी आगामी काळात धो-धो पाऊस पडू दे, असे साकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री नंदिकेश्वर चरणी घातले.
निरवांगीजवळील दगडवाडी येथील प्राचीन श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी विधिवत पूजा, दुग्धाभिषेक व आरती केली.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. नीरा व भीमा नद्या सध्या वाहत असल्या तरी पुरेसा पाऊस न झाल्यास नदीपात्रातील पाणी अधिक काळ टिकणार नाही. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस होणे गरजेचे आहे. नंदिकेश्वराच्या आशीर्वादाने चांगला पाऊस पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नीरा-भीमा कारखाना कार्यक्षेत्रातील नीरा नदीवरील कळंब ते नरसिंहपूरपर्यंतचे १३ बंधारे तसेच भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणु व शेवरे येथील बंधारे अडविण्याची जबाबदारी कारखाना घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये मे महिन्यापर्यंत पाणीसाठा उपलब्ध राहून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल,
___हर्षवर्धन पाटील
यावेळी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



