शैक्षणिक

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला कात्री; एसटी पासमध्ये तब्बल १३.५० टक्के वाढ.

इंदापूर,दि १२

  • उच्च शिक्षणासाठी दररोज एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आता आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या प्रवास पासच्या दरात तब्बल १३.५० टक्के वाढ केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

एकीकडे राज्य शासनाकडून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती आणि योजना जाहीर केल्या जात असताना, दुसरीकडे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एसटी प्रवासाच्या पासमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याने शासनाच्या धोरणातील विसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये दररोज एसटी बसने प्रवास करतात. शिक्षणाचा खर्च, महाविद्यालयीन शुल्क, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि इतर दैनंदिन खर्चाचा भार पालकांवर असतानाच आता प्रवासाच्या पासमध्ये झालेली वाढ त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर घालणारी ठरत आहे.

विशेषतः ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एसटीचा प्रवास हा परवडणारा पर्याय मानला जातो. मात्र पासच्या दरात झालेल्या वाढीमुळे महिन्याच्या शैक्षणिक खर्चाचे आर्थिक गणित बिघडणार असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना सवलती, मग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाढ का? असा सवाल आता पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावे, यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सवलती देण्याची गरज असताना प्रवासाचा खर्च वाढविणे हे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढत असल्याने शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होऊ लागली आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज असताना त्यांच्या प्रवासाच्या खर्चात वाढ करून शासन नेमके कोणते धोरण राबवत आहे? असा सवालही आता चर्चेत आला आहे. त्यामुळे एसटी पासच्या दरवाढीचा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!