क्राईम

Indapur Police strike Gutkha/इंदापूर पोलिसांची अवैध गुटख्याविरुद्ध धडक कारवाई; पिकअपमधून लाखोंचा साठा जप्त.

इंदापूर,दि २१

  • जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, इंदापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप वाहनातून अवैध गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 23 लाख 87 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार तसेच बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी ही कारवाई केली. इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवून होते.

दरम्यान, 20 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री पोलीस नाईक प्रकाश माने यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका पिकअप मालवाहू वाहनातून विमल गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.

पोलिस पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली असता बावडा बाजूकडून येणारे पिकअप वाहन क्रमांक MH42BU1029 संशयास्पद आढळले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळून आला.पोलिसांनी वाहन चालक आजमखान महमूद पठाण, रा. सरस्वतीनगर, इंदापूर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तसेच तपासादरम्यान संबंधित साठ्याबाबत माहिती घेतली असता सोहेल अरसलम शेख याचा सहभाग असल्याचे समोर आले.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माने हे इंदापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे, गुटखा तस्करी आणि इतर गैरप्रकारांविरोधात सातत्याने प्रभावी कारवाई करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि गोपनीय माहितीच्या अचूक पडताळणीमुळे यापूर्वीही अनेक कारवाया यशस्वी झाल्या आहेत. यावेळीही त्यांच्या तत्परतेमुळे लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.”

या कारवाईत विमल गुटखा व संबंधित माल असा एकूण 23 लाख 87 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन जप्त मालाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहन चालक आजमखान पठाण याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल हसीम मुलाणी करीत आहेत.

इंदापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांकडून आणखी कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!