विशेष

Indapur bus stand/इंदापूर बसस्थानकाच्या मागील परिसरात महिला, युवक-युवतींचा वाढता वावर; पालकांसह प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.

इंदापूर,दि २०

  • इंदापूर शहरातील बसस्थानकाच्या मागील परिसरात बाहेरगावाहून तसेच शेजारील तालुक्यांतून येणाऱ्या महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांचा वावर वाढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. विशेषतः काही जण एसटी बसने या परिसरात येतात आणि त्यानंतर खासगी वाहनांमधून इतरत्र जात असल्याचे चित्र दिसून येत असल्याने या परिसरातील हालचालींबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

इंदापूर बसस्थानकाच्या मागील बाजूस दररोज विविध वयोगटातील महिला तसेच युवक-युवती तोंडाला स्कार्फ बांधून अथवा मास्क घालून उभे राहत असल्याचे दिसत आहे. काही जण काही वेळ या परिसरात थांबल्यानंतर काळ्या काचा असलेल्या खासगी वाहनांमधून पुढे जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुपारच्या सुमारास याच वाहनांमधून काही जण पुन्हा बसस्थानकाच्या मागील बाजूस उतरतात आणि त्यानंतर एसटी बसने आपल्या गावाकडे रवाना होत असल्याचेही दिसून येते.

या सर्व हालचालींचा नेमका उद्देश काय आहे, संबंधित व्यक्ती कुठून येतात, कुठे जातात आणि या परिसरात त्यांचा नेमका वावर कशासाठी आहे, याची प्रशासनाने योग्य पद्धतीने पडताळणी करण्याची गरज आहे. कोणत्याही व्यक्तीवर केवळ संशयाच्या आधारे आरोप करणे योग्य नसले तरी सार्वजनिक ठिकाणी वारंवार होणाऱ्या अशा हालचालींकडे प्रशासनाने दुर्लक्षही करू नये.

विशेषतः बाहेरच्या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील महिला आणि युवक-युवती या परिसरात येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. एखाद्या महिलेला किंवा तरुणीला काही अडचण निर्माण झाल्यास त्यासाठी तातडीने मदत मिळण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

याच परिसरात शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही विद्यार्थी घरातून शाळा किंवा महाविद्यालयात जात असल्याचे सांगून प्रत्यक्षात इतरत्र जात नाहीत ना, याची पालकांनी खात्री करून घेणे गरजेचे आहे.आज अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात. मुलगा किंवा मुलगी सकाळी घरातून निघाल्यानंतर तो किंवा ती दिवसभर कुठे आहे, कोणाच्या संपर्कात आहे आणि शिक्षण संस्थेत नियमित उपस्थित आहे की नाही, याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे.

नुकतीच बारामती परिसरात प्रेमसंबंध आणि विवाहाची तयारी सुरू असताना तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनंतर अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील काही ठिकाणी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा होणारा वावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

पालकांनी आपल्या मुलांवर संशय घेण्यापेक्षा त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. मुलांच्या मित्रमैत्रिणींबाबत माहिती ठेवणे,शाळा-महाविद्यालयातील उपस्थिती तपासणे आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींकडे लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे.शिक्षण संस्थांनीही विद्यार्थी नियमितपणे वर्गात उपस्थित आहेत की नाही, याची माहिती पालकांना देणे आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी वारंवार गैरहजर राहत असल्यास किंवा त्याच्या वर्तनात अचानक बदल जाणवत असल्यास पालकांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

तसेच बसस्थानकाच्या मागील परिसरातील लॉज, हॉटेल, वाहनतळ आणि इतर ठिकाणी नियमांचे पालन होत आहे की नाही, याची संबंधित प्रशासनाने तपासणी करावी. अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणताही गैरप्रकार आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे.काळ्या काचा असलेल्या वाहनांबाबतही वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभागाने तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे.

गेल्या काही दिवसांत प्रेमसंबंधांमधून घडणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे एखादी गंभीर घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा वेळीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.इंदापूर बसस्थानकाच्या मागील परिसरातील महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या वावराबाबत प्रशासनाने वस्तुस्थिती तपासावी, परिसरात आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासोबतच महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळता येऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!