Good News Indapur/निमसाखर-बांगर्डे नीरा नदीवरील पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश.
३ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होणार, विद्यार्थ्यांचा होडी प्रवास थांबणार.

इंदापूर,दि १६
- इंदापूर तालुक्यातील निमसाखर आणि माळशिरस तालुक्यातील बांगर्डे या दोन गावांना जोडणाऱ्या नीरा नदीवरील पुलाच्या उभारणीसाठी केंद्रीय मार्ग निधीतून (सीआरएफ) २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे.
निमसाखर हे परिसरातील प्रमुख व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळे बांगर्डे तसेच परिसरातील गावांमधील नागरिकांची बाजारपेठ, शिक्षण आणि इतर कामांसाठी निमसाखर येथे नियमित ये-जा असते. मात्र, नीरा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यानंतर विद्यार्थ्यांना होडीतून प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निमसाखर, दगडवाडी, निरवांगी आणि बांगर्डे परिसरातील ग्रामस्थांनी पुलाची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्यानंतर केंद्रीय मार्ग निधीतून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
या पुलामुळे निमसाखर आणि बांगर्डे या गावांमधील संपर्क अधिक सुलभ होणार असून, इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. विद्यार्थ्यांचा धोकादायक होडी प्रवास थांबण्यासह शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुलासाठी निधी मंजूर झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



