Indapur politics/इंदापूरच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं शिजतंय काय?
दिसतं एक…आणि पडद्यामागे घडतंय दुसरंच?

इंदापूर,दि २८
- इंदापूर तालुक्यातील सध्याचे राजकीय वातावरण वरवर पाहता शांत दिसत असले, तरी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या भेटीगाठी आणि चर्चांमुळे पडद्यामागे वेगवान घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे, कोण कोणासोबत चर्चा करत आहे आणि कोणता नेता कोणत्या राजकीय समीकरणाच्या जवळ जात आहे, याचा अंदाज बांधणे सर्वसामान्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
दररोज एखादा नेता दुसऱ्या नेत्यासोबत दिसतो, चर्चा करतो किंवा एखाद्या कार्यक्रमात एकत्र येतो. मात्र या भेटी केवळ औपचारिक आहेत की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी आहे, हा प्रश्न सध्या इंदापूरच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
जनतेसमोरचे राजकारण आणि पडद्यामागील राजकीय हालचाली यामध्ये मोठी तफावत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. आगामी काळात काही अनपेक्षित राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर इंदापूर तालुक्याचे पुढील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सध्या कोणता नेता भाजपच्या जवळ जाणार? कोण राष्ट्रवादीसोबत राहणार? काँग्रेसची भूमिका काय असणार? आणि स्थानिक पातळीवर कोण कोणासोबत राजकीय जुळवून घेणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र अधिकृत घोषणा किंवा स्पष्ट भूमिका समोर येईपर्यंत या केवळ राजकीय चर्चा आणि अंदाज आहेत.
एकीकडे इंदापूरमध्ये दुष्काळाची परिस्थिती, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्येही जणू ‘राजकीय दुष्काळ’ निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पक्ष कोणताही असो, मनापासून राजकारण करण्यापेक्षा केवळ विरोधासाठी विरोध करण्याची वेळ आली आहे, अशी कुजबुज काही कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.
त्यामुळे इंदापूरच्या राजकारणातील खरा प्रश्न आता हा नाही की कोण कुणासोबत दिसतंय? खरा प्रश्न हा आहे की कोण कुणासोबत आहे? कोण कुणाच्या संपर्कात आहे? आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोणते राजकीय समीकरण उघड होणार?
इंदापूरचे राजकारण सध्या शांत दिसत असले, तरी या शांततेखाली अनेक राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूरच्या राजकारणात नेमके कोणते बदल घडतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



