थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; राज्य शासनाचे टेन्शन वाढले.
मुंबई,दि.१२
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडेकर प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहचलं आहे. या प्रकरणामध्ये आता थेट केंद्र सरकारने लक्ष घातलं आहे.
खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडेकर यांची निवड आणि त्यासाठी त्यांनी वापरलेला मार्ग या दोन्ही गोष्टी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. प्रशिक्षणार्थ असतानाही केबिन, स्वीय सहाय्यक यासारख्या गोष्टींची मागणी करण्याबरोबरच आता दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असो किंवा नॉन क्रिमीलेअरचं प्रमाणपत्र असो साऱ्याच गोष्टी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारकडून हवाय अहवाल
चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूजा यांची निवड झाली का अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. म्हणूनच आता थेट पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणात लक्ष घातलं असून यासंदर्भातील माहिती मागवली आहे. तसेच देशातील सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकदमीने (एलबीएसएनएए) सुद्धा यासंदर्भातील अहवालही महाराष्ट्र सरकारकडून मागवला आहे.
बदलीचं कारणच सांगितलं नाही
पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनासंदर्भातील सविस्तर तपशील पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना पाठवला आहे. यापूर्वी दिवसे यांनी लिहिलेल्या पत्रातून पूजा यांच्या वागणुकीसंदर्भात तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर पूजा यांची वाशिम येथे बदली झाली. मात्र या बदलीमागे गैरवर्तवणूक किंवा नेमकं काय कारण आहे याचा उल्लेख टाळून केवळ प्रशासकीय बदली असल्याचं सांगण्यात आलं. मात्र अशाप्रकारे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची बदली होण्याची घटना फारच दुर्मिळ मानली जाते. त्यातच आता नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने पूजा यांची नोकरीही जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे.
पंतप्रधान कार्यालयाने काय सांगितलं?
पंतप्रधान कार्यालयानेही पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला असल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने केवळ बदली केली असली तरी पूजा यांच्यावर थेट दिल्लीतून कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ पंतप्रधान कार्यालयच नाही तर एलबीएसएनएएनेही पूजा यांच्या प्रशिक्षण काळातील अहवाल मागवला आहे. एलबीएसएनएएचे उपसंचालक असलेल्या शैलेश नवल यांनी राज्य सरकारच्या सामन्य प्रशासन विभागाकडे पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अङवला मागवला आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची स्वाक्षरी असलेला अहवाल पाठवावा, असे निर्देश एलबीएसएनएएने दिल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’ने म्हटलं आहे.