आरोग्य

चार तासांची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी; इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने जिंकला रुग्णांचा विश्वास.

इंदापूर,दि.२

  • शासकीय रुग्णालयांबाबत अनेकदा नकारात्मक चर्चा होत असताना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेची प्रचिती देत अत्यंत गुंतागुंतीची गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. दि. ३० जून २०२६ रोजी श्रीमती पूजा गुळूमकर (वय ३६) यांच्या उजव्या गुडघ्यावर सुमारे चार तास चाललेली अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सुमारे दहा दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात पूजा गुळूमकर यांच्या उजव्या गुडघ्याचा सांधा पूर्णपणे फुटला होता. सांध्यातील हाडे एकमेकांत इतक्या गंभीरपणे अडकली होती की ही शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानली जात होती. त्यातच रुग्णाला रक्ताची कमतरता होती आणि अपघातामुळे पायाला मोठ्या प्रमाणात सूज आली होती. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरू शकत होते.याची गंभीर दखल घेत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी घाई न करता प्रथम रुग्णावर आवश्यक उपचार केले. दहा दिवसांच्या उपचारानंतर रक्ताची पातळी पूर्ववत करण्यात आली, पायावरील सूज कमी करण्यात आली आणि त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला पूर्णपणे तयार करण्यात आले.

त्यानंतर दि. ३० जून रोजी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. क्षीरसागर डी. बी. यांनी डॉ. मिलिंद खाडे (भूलतज्ज्ञ) आणि अंकुश बळगानूरे (शस्त्रक्रिया सहाय्यक) यांच्या सहकार्याने ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. तब्बल चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान गुडघ्याचा सांधा पूर्णपणे उघडून तुटलेली व एकमेकांत अडकलेली हाडे पूर्ववत बसवण्यात आली. एवढेच नव्हे तर दबलेल्या हाडाची भरपाई करण्यासाठी रुग्णाच्या कमरेच्या हाडाचा काही भाग काढून तो गुडघ्यात प्रत्यारोपित करण्यात आला. त्यामुळे रुग्णाचा गुडघा सुरक्षित ठेवण्यात डॉक्टरांना यश आले.

विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयांमध्येही चौकशी केली होती. मात्र त्यांनी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवत येथेच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे हा विश्वास सार्थ ठरला असून रुग्णाचा खाजगी रुग्णालयात होणारा अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च वाचला आहे.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वीही अनेक जटिल अस्थिरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. येथे सर्व प्रकारच्या हाडांच्या शस्त्रक्रिया, सांधा प्रत्यारोपण, तसेच लहान मुलांच्या हाडांवरील शस्त्रक्रियांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये धाव घेण्याची गरज कमी होत असून, दर्जेदार उपचार त्यांच्या परिसरातच उपलब्ध होत आहेत.

  • शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व संपूर्ण वैद्यकीय पथक सातत्याने प्रयत्नशील आहे. रुग्णांना गुणवत्तापूर्ण व परवडणारी आरोग्यसेवा मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासन विशेष लक्ष देत आहे. तसेच रुग्णालयाच्या कामकाजासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आणि उपसंचालक यांचे सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, योग्य नियोजन, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयातही अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या जाऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा शासकीय आरोग्य सेवेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!