स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची दमदार कारवाई; २४ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड.

बारामती,दि २४
- बारामती तालुक्यातील जैनकवाडी फाटा येथे तरुणाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. या कारवाईत दोन आरोपींसह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि २२ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कृष्णा दीपक सुपेकर (वय २०, रा. शारदानगर, ता. बारामती, मूळ रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे भिगवण रोडने बारामतीकडे जात असताना जैनकवाडी फाटा येथे चार अज्ञात इसमांनी त्यांना अडविले. आरोपींनी मारहाण, शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सॅमसंग एस-२४ मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४), ११५(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे तुषार भाऊ ढोबे (रा. कसबा, बारामती), राहुल दिनेश बेंद्रे (रा. खंडोबा नगर चारी, बारामती) तसेच दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली यामाहा मोटारसायकल, होंडा अॅक्टिव्हा आणि चोरी केलेला मोबाईल असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, अजय घुले, सुलतान डांगे तसेच पोलीस अमलदार रहिस मुलाणी, गणेश डेरे आणि तुषार चव्हाण यांनी यशस्वीपणे पार पाडली.



