इंदापुर मध्ये मटका खेळाचा “सुवास” कोणाच्या आशीर्वादाने दरवळतोय.?
अवैध मटका खेळाला इंदापूर मध्ये अभय कोणाचे.?

इंदापूर,दि.३
- इंदापूर शहरांमध्ये जागोजागी मटका या अवैध व्यवसायाने उघडपणे थैमान घातले असून या मटका खेळामुळे अनेकांचे प्रपंच देशोधडीला लागले आहेत. विशेष म्हणजे महत्वाच्या ठिकाणी व वर्दळीच्या जागेवरती मटका या खेळाचा सुवास प्रशासनातील काही लोकांच्या आशीर्वादाने दरवळत असल्याची चर्चा जागोजागी रंगत आहे. त्यामुळे इंदापूर मधील अवैद्य मटका अड्ड्यांवरती कारवाई का केली जात नाही अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
इंदापूर मध्ये दोन डझन पेक्षा अधिक ठिकाणी मटका हा आकड्यांचा जुगारी खेळ उघडपणे खेळला जात आहे. विशेष बाब म्हणजे मुख्य रस्त्यावरती लहान-लहान टपऱ्यांच्या माध्यमातून या खेळाचे आकडे लावले जात आहेत. या टपऱ्यांवरती प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी प्लास्टिकच्या भरणीमध्ये बॉल विक्रीसाठी ठेवले आहे असे भासवले जाते. मात्र, या ठिकाणी बॉल न विकता मटक्याचे आकडे लावले जात आहेत. या सर्वांना सर्वसामान्य व गरीब लोक बळी पडत असून आकडे लावून झटपट श्रीमंत होण्याऐवजी झटपट कंगाल होऊ लागले आहेत.
उजनीतील वाळू उपसा वरती कारवाई होते, अवैध पणे गावठी दारू बनवणाऱ्या भट्टींवरती कारवाई होते, मात्र इंदापूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या मटका खेळा वरती कारवाई का होत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंदापूर शहरामध्ये गेली अनेक महिन्यांपासून खुलेआम सुरू असलेल्या या जुगारामध्ये असा कोणता “सुवास'(सुगंध ) लपला आहे की प्रशासनातील अधिकारी त्याला ओळखू शकले नाहीत.हा आकड्याचा खेळ खेळण्यासाठी इंदापुर मध्ये दररोज अनेक सामान्य लोक येत आहेत. मटका खेळामध्ये सर्वसामान्य लोक फसले जात असून लोकांचा प्रपंच या खेळामुळे देशोधडीला गेलेला आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये अवैध दारू व्यवसाय वरती कारवाई होते. परंतू मटका या अवैध खेळा वरती कारवाई का होत नाही. इंदापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व मुख्य रस्त्याच्या बाजूला लहान लहान टपऱ्यांवरती खेळला जाणारा खेळ पोलिसांना कसा माहीत होत नाही. सदर खेळाची सुरुवात करणारी व्यक्तीचे प्रशासनातील कोणाशी काही लागेबांधे आहेत का .? त्यामुळेच कारवाई होत नसेल अशी सामान्य लोकांमध्ये व नागरिकांमध्ये इंदापूर शहरात चर्चा आहे.



