Tahsildar jivan bansode/तहसीलदार जीवन बनसोडे सर्वात भ्रष्ट अधिकारी; भाजपकडून तहसीलदारांच्या खातेनिहाय चौकशीची मागणी.
इंदापूर चे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप.

इंदापूर, दि.५
- इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे हे भ्रष्टाचारात गुंतले असून तालुक्यातील अवैध धंद्यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आकाश कांबळे यांनी केला. ते इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचे आकाश कांबळे म्हणाले की, नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाने भिगवण येथे “छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियान” राबविले.मात्र, या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नाही. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी तहसीलदारांना द्वेष आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना आकाश कांबळे यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या बद्दल तीव्र शब्दात नाराजी दर्शवत म्हटले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज हे तहसीलदार कुठल्यातरी शेतात शेतमजूर म्हणून काम करत असते. उजनी परिसरातील कथित वाळू उपसा, शेतकऱ्यांची अडवणूक आणि महसूल प्रशासनाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तहसीलदार जीवन बनसोडे हे इंदापूर तालुक्याचे मालक असल्यासारखे गर्विष्ठपणे वागत आहेत, ते सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी आहेत असा आरोपही त्यांनी केला.तहसीलदार जीवन बनसोडे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याचे भाजपचे आकाश कांबळे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष राम आसबे, पश्चिम मंडळ अध्यक्ष राजू जठार, शहराध्यक्ष किरण गानबोटे, युवा मोर्चा सरचिटणीस मयूर शिंदे, युवा मोर्चा शहराध्यक्ष लखन जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



