दुबईत अडकलेले इंदापूरचे संतोष नवनाथ राऊत मायदेशी परतले; युद्धजन्य परिस्थितीतून सुखरूप सुटका.

इंदापूर,दि ५
- खाडी देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये अडकलेले इंदापूर येथील संतोष नवनाथ राऊत अखेर सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यांच्या परतीमुळे कुटुंबीयांसह इंदापूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
संतोष नवनाथ राऊत हे एलआयसीचे एजंट असून ते जागतिक कॉन्फरन्ससाठी दुबई येथे गेले होते. मात्र त्याच दरम्यान खाडी भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. इराणकडून दुबईमधील काही ठिकाणी ड्रोन व मिसाईल हल्ले झाल्याच्या बातम्यांमुळे तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक दुबईमध्ये अडकून पडले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संतोष राऊत यांनी “आम्हाला दुबईमधून बाहेर काढा” अशी विनंती करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत इंदापूरमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.
खाडी देशांतील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे दुबईमध्ये अडकलेल्या अनेक भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले. त्याच मोहिमेत संतोष नवनाथ राऊत यांनाही भारतात परत आणण्यात आले आहे.
संतोष राऊत सुखरूप मायदेशी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून इंदापूर परिसरातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.



