इंदापूरला राजकीय बळ; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी श्रीमंत ढोले.

इंदापूर,दि ७
- पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंद पाकिटातून श्रीमंत ढोले यांच्या नावाची शिफारस केली होती.नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी हे बंद पाकिट उघडत गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीमंत ढोले यांनी यापूर्वी २०१२ ते २०१७ या कालावधीतही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी श्रीमंत ढोले यांची उमेदवारी जाहीर केली होती.
काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून श्रीमंत ढोले यांनी सुमारे १३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करण्याची क्षमता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका यामुळे त्यांना पक्षात विशेष मान आहे.
जिल्हा परिषदेमध्ये गटनेता हा पक्षाचा सर्वोच्च प्रतिनिधी मानला जातो. सभागृहात पक्षाची भूमिका मांडणे, सदस्यांमध्ये समन्वय साधणे तसेच विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांवर पक्षाच्या धोरणांनुसार प्रभाव टाकणे ही गटनेत्याची प्रमुख जबाबदारी असते. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये गटनेता हा पक्षाचा “सुकाणू” मानला जातो.



