इंदापूर मध्ये पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल मालकाकडून खंडणी.
इंदापुरात दोन तोतया पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल.

इंदापूर, दि. १६
- इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथे पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून सातत्याने खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या दोन्ही आरोपीस इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे.गागरगाव (ता. इंदापूर) येथील ‘९६ कट्टा’ नावाचे हॉटेल चालवणारे व्यावसायिक नितीन गोरख तळेकर (सध्या रा. गागरगाव, मूळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी भूषण साळवे (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे) व संदीप रासकर (रा. महात्मा फुले चौक, कस्तुरबा चौक, पुणे ४२) हे स्वतःला पुण्यातील मोठे पत्रकार असल्याचे भासवत तक्रारदारास सातत्याने फोन करून धमक्या देत होते. “तुम्ही हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालवता, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील हॉटेल मालकांकडून आम्हाला दरमहा पैसे येतात. व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा हॉटेल बंद पाडून बदनामीकारक बातम्या प्रसारित करू,” अशी धमकी आरोपी देत होते.
या भीतीपोटी तक्रारदार नितीन तळेकर यांनी आरोपींच्या मोबाईल क्रमांकावर फोन-पे तसेच रोख स्वरूपात अनेक वेळा पैसे दिले. मात्र पुढे आरोपींनी दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी सुरू केल्याने तक्रारदार मानसिक तणावात सापडले. या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत इंदापूर पोलिसांनी आरोपी भूषण साळवे व संदीप रासकर यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या तोतया पत्रकारांवर यापूर्वी पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे तसेच मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. इंदापूर पोलिसांनी वेळेवर कारवाई करत या खंडणीखोर तोतया पत्रकारांच्या मुसक्या आवळल्याने व्यावसायिक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.



