राजकीय

वडापुरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे मनोहर भोसले सज्ज; मंत्री दत्तात्रय भरणेंकडून उमेदवारीची अपेक्षा.

इंदापूर,दि १५

  • इंदापूर तालुक्यातील वडापुरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर भोसले हे आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या मनोहर भोसले यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भाटनिमगाव गावचे माजी सरपंच असलेले मनोहर भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील प्रत्येक गावाशी थेट जनसंपर्क ठेवून कार्यरत आहेत. राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण यामुळे त्यांना सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे हे माझ्या कार्याचा आणि अनुभवाचा नक्कीच विचार करून मला उमेदवारी देतील, अशी अपेक्षा मनोहर भोसले यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे वडापुरी गणामधील गावोगावी कार्यकर्त्यांकडून “मनोहर भोसले यांनाच उमेदवारी द्या” अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील राजकारणात एक महत्त्वाची चर्चा रंगू लागली आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येऊन निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास मला निश्चितच आनंद होईल आणि दोन्ही नेते माझा सकारात्मक विचार करून मला उमेदवारी देतील, असे मत मनोहर भोसले यांनी व्यक्त केले आहे.

वडापुरी गणातील आगामी पंचायत समिती निवडणूक आता अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून मनोहर भोसले यांच्या भूमिकेकडे राजकीय लक्ष वेधले गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!