AI INDAPUR/ए.आय.च्या जगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्षम व स्वावलंबी करावे:- राजेंद्रदादा पवार.

इंदापूर,दि २७
- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीसभा कार्यक्रमानिमित्त इंदापूर येथील सौ.कस्तराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये जयंती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्रदादा पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की काळाची पावले ओळखून शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान व एक.आयचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरू झाला असून पारंपारिक शिक्षण पद्धती आता कुचकामी ठरत आहे. त्यामुळे भावी युवापिढी सक्षम घडविण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी काळाबरोबर बदलणे गरजेचे असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून मला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी शाळेच्या अपुऱ्या भौतिक सुविधांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच यापुढे शाळेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना व स्कुल कमिटी सदस्य म्हणून सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंत माने यांनी विद्यालयाच्या रंगकामासाठी विजयकुमार शिंदे यांच्या मागणीनुसार पाच लाख रुपये देण्याची जाहीर केले. तसेच रयतचा माजी विद्यार्थी असल्याचा सदैव अभिमान वाटतो.विद्यार्थ्यांनी कितीही कठीण परिस्थिती असली तरी पुढे चालत रहावे मार्ग आपोआप सापडतो,प्रयत्न करत रहा यश नक्की मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभा केलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.सोनई परिवाराचे प्रमुख युवानेते प्रवीण माने यांनी कर्मवीर जयंती निमित्त शुभेच्छा देऊन विद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
इंदापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विकास जाधव यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कर्मवीर अण्णांनी स्वतःच्या कुटुंबा पेक्षा गोरगरिबांची मुले शिकवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.कर्मवीरांच्या विचारांचा जागर व्हावा आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन आपण कर्मवीरांच्या कृतीचे पाईक होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा समिती सदस्य कैलास कदम व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी ॲड.राहुल मखरे,शिवाजीराव मखरे,ॲड गिरीश शहा,ॲड.इनायतअली काझी,अनिल ढावरे, पोपट जाधव, छाया जाधव, सयाजी काटकर, सुनील जाधव, बाळकृष्ण क्षीरसागर, महादेव चव्हाण, हमीद आत्तार,जयकुमार शिंदे, तय्यब शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते, अश्विनी अभंग व स्वाती गाढवे यांनी तर आभार होनाजी गवळी यांनी मानले.



