शैक्षणिक

इंदापूरमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा गैरप्रकार? चौकशीची मागणी.

वरिष्ठ पातळीवर संबंधित प्रकाराची चौकशी होणार का..?

इंदापूर,दि २१

  • इंदापूर तालुक्यातील आरटीई (Right to Education) अंतर्गत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, अनेक अर्जदारांनी शाळेजवळ राहात नसतानाही खोटे पत्ते दाखवून प्रवेश मिळविल्याचे समोर आले आहे. काहींनी शाळेपासून केवळ ०.३४ मीटर,०.३७ मीटर किंवा ०.४७ मीटर अंतर दाखवत फॉर्म भरले असून प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहती घरेच नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता पडताळण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, काही ठिकाणी केवळ दोन खोल्यांच्या पत्र्याच्या घरांवर अनेक भाडेकरार करून देण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. पैसे घेऊन बनावट भाडेकरार तयार करून देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप असून, अनेक करार हे अर्ज सादर केल्यानंतरच्या तारखांचे असल्याचेही समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेत अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. इंदापूरपासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आरटीई अंतर्गत प्रवेश मिळत असल्याचे उदाहरण देत, एक किलोमीटर अंतराच्या नियमाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरटीईचा मुख्य उद्देश गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणे हा असताना, प्रत्यक्षात मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम व प्रभावशाली लोकांकडून या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!