विशेष

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तीन कामगारांचा जागीच मृत्यू.

इंदापूर,दि १७

  • पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात आज दि १७ रोजी सकाळी भीषण अपघात घडला आहे . क्रुझर गाडीचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर वाहनातून काही कामगार प्रवास करत होते. दरम्यान, लोणी देवकर एमआयडीसीजवळ येताच गाडीचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुसऱ्या लेनमध्ये गेली. याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकवर क्रुझरची जोरदार धडक झाली.

धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन क्रुझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात क्रुझरमधील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. काहीजण जखमी झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जात असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच डाळज येथील महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात येत आहे. तसेच अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग, तसेच टायर फुटण्यामागील कारण याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!