वडापुरी- माळवाडी जिल्हा परिषद गटातून लक्ष्मण देवकाते व माळवाडी गणातून आप्पासाहेब माने निवडणूक लढवण्याची तयारी.

इंदापूर,दि.१५
- अवघ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. कारण काल पुणे जिल्हा परिषद गट व गण रचनेची यादी प्रसिद्धी झाली आहे. त्यातच इंदापूर तालुक्यातील माळवाडी गणातून अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. या तयारी मध्ये लक्ष्मण देवकाते व आप्पासाहेब माने यांनी आघाडी घेतली आहे.
इंदापूर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले असून अनेक गावे या गणातून त्या गणात तर काही गावे दुसऱ्याच गटात गेले आहेत. त्यातच यंदा वडापुरी- माळवाडी हा नवा जिल्हा परिषद गट निर्माण झाला असून त्यामध्ये माळवाडी गण निर्माण झाला आहे. या माळवाडी गणामध्ये नव्याने शहा व सरडेवाडी ही दोन गावे समाविष्ट केली आहेत. या गणात बहुतांश ओबीसी मतदार अधिकचा असून अनेक जण निवडणूक लढवण्याच्या तयारीला कालपासून लागले आहेत.
त्यातच माळवाडी गणातून शिरसोडी येथील युवा नेते लक्ष्मण जगन्नाथ देवकाते व सरडेवाडी येथील विद्यमान सरपंच आप्पासाहेब माने यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या पंचायत समिती /जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण देवकाते यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत लक्ष्मण देवकाते यांना यश आले नसले तरी अपेक्षा-पेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मतदारांनी दिला होता. लक्ष्मण देवकाते यांची युवकांमध्ये प्रतिमा चांगली असून त्यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक लढवायची व जिंकायची असा निश्चय लक्ष्मण देवकाते यांनी केला आहे.
तर सरडेवाडी गावचे विद्यमान सरपंच आप्पासाहेब माने यांनीही माळवाडी गटातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून या गटामध्ये आप्पासाहेब माने यांचा जनसंपर्क चांगला आहे. तसेच गेली दोन टर्म ते सरडेवाडी गावचे सदस्य तर सध्या ते विद्यमान सरपंच आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आप्पासाहेब माने यांचे काम चांगले आहे.त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वडापूरी-माळवाडी जिल्हा परिषद गटाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वडापूरी – माळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून लक्ष्मण देवकाते (शिरसोडी), आप्पासाहेब माने (सरडेवाडी), दिलीप पाटील (शहा), मनोहर भोसले (भाटनिमगाव), सतीश पांढरे (शहा), सचिन खामगळ (शिरसोडी), बाळासाहेब व्यवहारे ( माळवाडी), अतुल व्यवहारे (माळवाडी) हे इच्छुक आहेत. मात्र यामधील कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.



