विशेष

इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प मंजूर ; करवाढ नाही,विकासकामांसाठी कोट्यवधींची तरतूद.

इंदापूर,दि २८

  • इंदापूर नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. दि. २७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शाह यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष, सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सदस्य, मुख्याधिकारी रमेश ढगे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या अर्थसंकल्पा वेळी नगराध्यक्ष भरत(शेठ)शहा यांनी आपले मनोगत मांडताना शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सेवा, पाणीपुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम, डिजिटल प्रशासन आणि उत्पन्नवाढ यांना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.

या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. एकूण अंदाजित महसुली व भांडवली जमा कोट्यवधी रुपयांची असून त्याच प्रमाणात खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षातील शिल्लक रक्कमही नव्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत इंदापूर शहरासाठी नवीन भुयारी गटार योजना व रस्ते विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून कामे प्रगतीपथावर आहेत.

तसेच महिला-बालकल्याण, दिव्यांग, दुर्बल घटक, क्रीडा महोत्सव, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, नागरी सुविधा केंद्रांचे सक्षमीकरण यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेऊन नवीन रस्ते, प्रशासकीय इमारत आणि भविष्यातील शहर विकास आराखड्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

सन २०२६–२७ चा अर्थसंकल्प सविस्तर चर्चेनंतर सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. शहराच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!