INDAPUR minor girl/ अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन महिन्यांनंतरही तपासाला गती नाही.
पीडित आईची पोलीस प्रशासनाकडे अपहरण करणाऱ्या मुलाच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

इंदापूर,दि ६
- इंदापूर तालुक्यातील चितळकवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या कथित अपहरण प्रकरणात दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. या प्रकरणात तपास जलदगतीने करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत पीडित आईने अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
अपहरणग्रस्त मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथून १६ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचे २५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अपहरण झाल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी आरोपी म्हणून अशोक उर्फ अश्वबा अर्जुन याचे नाव नमूद करण्यात आले असून, इंदापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पीडित आईच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा नात्यातील व्यक्ती असून मुलीला फूस लावून घेऊन गेला. पुढे २ एप्रिल २०२६ रोजी आळंदी येथे विवाह केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, तपास अधिकाऱ्यांना आरोपीच्या हालचालींबाबत वेळोवेळी माहिती देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. संबंधित वाहनाचा क्रमांक तसेच आरोपीच्या नातेवाईकांची माहितीही पोलिसांना दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
संबंधित गंभीर गुन्ह्यातील गाडी नंबर MH २५,AG 9385 पोलिसांनी सोडून दिली आहे, सदरची गाडी आरोपीचा चुलता गणेश वसंता अर्जुन यांच्या नावे आहेत. त्यामुळे गणेश वसंता अर्जुन यांच्यासहित आरोपीची सख्खी भाऊ व चुलत भाऊ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास वेगाने करून अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध घ्यावा तसेच संबंधित आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर संबंधित व्यक्ती व पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचे अपहरण ग्रस्त पीडित मुलीच्या आईने म्हटले आहे


