विशेष

इंदापूरमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार उघड; बंद ३३ केव्ही हायटेंशन लाईनमुळे अंबिकानगर मधील रहिवासी त्रस्त.

इंदापूर,दि ६

  • इंदापूर शहरातील अंबिकानगर परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणाचा आणि भोंगळ कारभाराचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी अंडरग्राउंड ३३ केव्ही हायटेंशन वीज लाईनचे काम पूर्ण होऊन नवीन लाईन कार्यरत झाली असतानाही जुनी बंद पडलेली लाईन अद्यापही खांबावर लोंबकळत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यापूर्वी अंबिकानगर परिसरातून ग्रामीण भागाकडे जाणारी ३३ केव्ही वीज लाईन लोखंडी खांबांवरून टाकण्यात आली होती. मात्र अंडरग्राउंड लाईन सुरू झाल्यानंतर ती जुनी लाईन वापरात नसतानाही मागील दोन वर्षांपासून तशीच उभी आहे. अनेक ठिकाणी या लाईनचे लोखंडी खांब व तारा घरांच्या अगदी जवळ किंवा काही घरांच्या छतावरून जात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात परिसरातील नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या, पाठपुरावा केला; मात्र त्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. घरांच्या वरून जाणाऱ्या तारांमुळे नागरिकांना घरांची दुरुस्ती, बांधकाम किंवा छतावरील इतर कामे करता येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनात मोठी गैरसोय होत आहे.

अंबिकानगर परिसरात दाट लोकवस्ती असल्याने उभे असलेले लोखंडी खांब व त्यावरील तारा भविष्यात मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरीही महावितरण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना महावितरण प्रशासन अजूनही का गप्प बसले आहे? असा संतप्त सवाल अंबिकानगरमधील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बंद असलेली जुनी ३३ केव्ही लाईन तात्काळ हटवून लोखंडी खांब व तारा काढून टाकावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!