पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.
मुंबई, दि. २६
- पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.