Two Brothers Company/इंदापूर-लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतील टू ब्रदर्स कंपनीवर कामगारांच्या आर्थिक शोषणाचे गंभीर आरोप.

इंदापूर,दि २७
- Two brothers company/ इंदापूर औद्योगिक वसाहतीतील टीबीओएफ (TBOF) फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर कामगारांचे आर्थिक शोषण, किमान वेतन कायद्याचे उल्लंघन, अनेक वर्षे काम करूनही कायम नोकरी न देणे, वेतनात मोठ्या प्रमाणावर तफावत ठेवणे, कामगारांना अपमानास्पद वागणूक देणे आणि गंभीर गैरव्यवहार केल्याचे आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा, कंपनीसमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा तक्रारदार संभाजी बन्सी मोरे यांनी दिला आहे. तसा तक्रारी अर्ज तहसील कार्यालय इंदापुर यांना दिला आहे.
तक्रारीनुसार, संभाजी मोरे यांचा मुलगा ऋषिकेश संभाजी मोरे आणि मुलगी उज्ज्वला संभाजी मोरे हे दोघेही कंपनीत अनेक महिन्यांपासून काम करत आहेत. मात्र, कंपनीकडून कामाच्या बदल्यात शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनाप्रमाणे वेतन दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीत कायमस्वरूपी काम करूनही कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात असून, कामगारांच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
याचबरोबर कंपनीमध्ये रोख स्वरूपात वेतन देऊन अधिकृत नोंदींमध्ये वेगळी माहिती दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वेतन पावत्या, कामाचे स्वरूप आणि प्रत्यक्ष दिले जाणारे मानधन यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे कंपनीकडून कामगारांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारीत कंपनीच्या एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी कामगारांशी अपमानास्पद भाषा वापरून मानसिक छळ केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तक्रार मांडण्यासाठी गेल्यानंतर उद्धट वागणूक देण्यात आली, धमकीचे वातावरण निर्माण करण्यात आले आणि तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे संभाजी मोरे यांनी म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म या कंपनी वरती व आमच्यावरती केलेला आरोप चुकीचा आहे. आमच्याकडून कोणत्याही कामगाराचे आर्थिक शोषण होत नाही. तसेच संभाजी मोरे यांची दोन्हीही मुले ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या कंपनीमध्ये कामाला असावेत. तसेच आम्ही कोणत्याही धर्मावर अथवा जाती वरती कधीच बोलत नाही. जे आरोप मोरे यांनी आमच्यावर जे केले त्या धर्माची अथवा जातीचे अनेक कामगार आमच्या कंपनीमध्ये काम करतात. उलट संभाजी मोरे यांच्याकडून आम्हाला नाहक त्रास होत असून उलट त्यांच्याकडूनच आमची पिळवणूक होत आहे.
पराग पाटील.
( Manager- Two brothers organic farm)
याशिवाय कंपनीमध्ये तयार होणाऱ्या तूप, ताक व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेबाबतही शंका उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री, कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन आणि इतर संबंधित विभागांना पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित कंपनीविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास आणि न्याय न मिळाल्यास कंपनीसमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा निर्धार संभाजी मोरे यांनी व्यक्त केला आहे.



