पुणे,दि.१७
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना यश आले आहे.
या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर ठार झालेल्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला माओवाद्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील कांकेर जिल्ह्यातील पांखाजूर आणि गडचिरोलीच्या जंगलामध्ये ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर तीन तास चाललेल्या या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना सध्या पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टर ने गडचिरोलीला रवाना करण्यात आले आहे. सुमारे तीन तास चाललेल्या या चकमक आजूनही काही माओवादी मारल्या गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या परिसरात पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन सुरू केले असून कसून तपास सध्या सुरू आहे.
चकमकीत पोलीस उपनिरीक्षक जखमी, हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट
या प्रकरणी हाती आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे 3 तास चकमक सुरू होती. यात एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टर ने एअरलिफ्ट करून गडचिरोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जवनांच्या मदतीसाठी बॅकअप फोर्सही पाठवण्यात आला आहे. जखमी उपनिरीक्षक सतीश पाटील हे महाराष्ट्राच्या C-60 दलात आहेत. त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागल्याची माहिती आहे. कांकेर येथील बांदा येथून त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे.
छत्तिसगडच्या कांकेर जिल्ह्यातील पांखाजूर आणि गडचिरोलीच्या जंगलात झाल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीसचे C-60 चे जवान गडचिरोली येथून नक्षल विरोधी अभियानासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान झारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवाद्यांशी चकमक झाली. सध्या परिसरात शोध सुरू आहे. सैनिक परतल्यानंतरच अधिक माहिती मिळेल.
14 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.