कर्दनवाडीचा सुपुत्र पृथ्वीराज मुळीक भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट; ग्रामीण भागातून देशसेवेच्या शिखराकडे झेप.
एनडीए, एसएसबीसह कठीण टप्पे पार करत देशातील अवघ्या ९० उमेदवारांमध्ये निवड.

इंदापूर,दि.१२
- इंदापूर तालुक्यातील कर्दनवाडी येथील पृथ्वीराज मुळीक याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली असून, ग्रामीण भागातील या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय सैन्यदलातील अधिकारी पद मिळवून पृथ्वीराजने कर्दनवाडीसह इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
पृथ्वीराजचे प्राथमिक शिक्षण श्री वेंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल, कळंब-वालचंदनगर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये पूर्ण झाले. लहानपणापासूनच सैन्यदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगलेल्या पृथ्वीराजने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले.
बारावीनंतर झालेल्या सैन्यदलाच्या मुख्य परीक्षेसाठी देशभरातून सुमारे पाच ते सहा लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २० हजार विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सतर्फे आयोजित सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्यात आले.
अंतिम गुणवत्ता यादीत १३४ विद्यार्थी आले असताना, उपलब्ध जागांनुसार देशभरातून केवळ ९० उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यामध्ये पृथ्वीराज मुळीक याने स्थान मिळवत लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळवली.
पृथ्वीराजचे वडील पोपटराव मुळीक यांचीही देशसेवेची इच्छा होती. मुलाने सैन्यदलात अधिकारी बनून कुटुंबाचे स्वप्न साकार केल्याने मुळीक कुटुंबाने समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पृथ्वीराज मुळीक यांचे यश प्रेरणादायी ठरले असून, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.”



