भाटनिमगाव अत्याचार प्रकरण तापलं; पिडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप आमदार मैदानात.

इंदापूर,दि ९
- इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील पीडित कुटुंबाची आमदार अमित गोरखे आणि धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सांत्वनपर भेट घेत कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली.
आमदार अमित गोरखे यांनी पीडित मुलीच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत, संबंधित प्रकरणात तात्काळ उपाययोजना करण्यासाठी समाजकल्याण अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी धवलसिंह मोहिते-पाटील यांनीही या घटनेचा निषेध करत पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. महिलांचे व मुलींचे संरक्षण हे समाजाचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी प्रकरणाचा तपास जलदगतीने करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच, पीडित कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास कडक उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भाटनिमगाव येथील या कुटुंबाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमची लेक उद्ध्वस्त झाली, आमचे जगणेच कठीण झाले आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या. आमच्यावर दबाव आणला जातोय, धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही भयभीत आहोत. शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला संरक्षण द्यावे,” अशा शब्दांत पीडित मुलीच्या आईने आपल्या भावना व्यक्त करत न्यायाची आर्त हाक देत हंबरडा फोडला.



